Thursday, May 29, 2008


प्रखर देशभक्त , महान क्रांतिकारक , प्रतिभावान महाकवी , तत्त्वज्ञ-विचारवंत , विज्ञाननिष्ठ-हिंदुत्त्ववादी , प्रेरक इतिहासकार आणि कर्ते समाजसुधारक असे सावरकरांच्या जीवनाचे विविध आयाम आपल्याला ठाऊक आहेत. त्यातले अनेक लोकप्रिय आहेत , सावरकरभक्तांनी आपल्या आराध्याविषयी बरीच माहिती इंटरनेटवर जमा केलेय. पण त्याच्याही पुढे जाऊन, थोडेसे वेगळे सावरकर ‘ वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

जात्युच्छेदक निबंध

स्वातंत्र्यवीरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात खूप मोठे प्रयत्न केले. शिवाय त्यासाठी एक वैचारिक मांडणीही केली. अस्पृश्यता मेली , पण तिचे और्ध्वदैहिक अजून उरले आहे! या लेखाच्या या पूर्वाधातून ही मांडणी काही अंशी कळू शकेल...
.................................

'Untouchability is abolished and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability shall be an offence punishable in accordance with law."(The Constitution of India, Article 17)
"अस्पृश्यता नष्ट केली जात आहे. कोणत्याही प्रकारे ती आचारली जाता कामा नये. अस्पृश्यताजन्य अशी कोणचीही हीनता कोणावरही लादणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल. '
(भारतीय राज्यघटना छेदक १७)

ही घोषणा ज्या दिवशी आपल्या भारतीय राज्यघटना समितीने एकमुखाने संमतिली तो दिवस सुवर्णदिन समजला गेला पाहिजे. अशोक स्तंभासारख्या एखाद्या चिरंतन स्तंभावर कोरून ठेवण्या इतक्या महत्त्वाची आहे ही महोदारघोषणा.

गेली कित्येक शतके ज्या शतावधि साधुसंतांनी , समाजसुधारकांनी नि राजकारणधुरंधुरांनी ही जन्मजात अस्पृश्यतेची बेडी तोडून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांच्या त्या सार्‍या प्रयत्नांचे , ही घोषणा ज्या दिवशी केली गेली त्या दिवशी साफल्य झाले. आता ही अस्पृश्यता पाळणे हे नुसते एक निंदनीय पाप राहिलेले नसून तो एक दंडनीय अपराध (गुन्हा) ठरलेला आहे. अस्पृश्यता पाळू नये हा नुसता एक विध्यर्थी नीतिनियम असा एक आज्ञार्थी निर्बंध (कायदा) झाला आहे.

वर उल्लेखिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या सतराव्या छेदकात अस्पृश्यता असा एकेरी शब्दच काय तो वापरला आहे. तथापि नैर्बधिक काटेकोरपणाच्या दृष्टीने त्या शब्दाचे स्पष्टीकरण करणारी एखादी टीप तरी तिथे देण्यास हवी होती. वैद्यकीय , वैयक्तिक नि प्रासंगिक अशी अस्पृश्यता समाजहितासाठीच केव्हा केव्हा निषिद्ध मानता येणार नाही. अर्थात्‌ह्या छेदकात ज्या अस्पृश्यतेचा अंत करण्यात आला आहे ती अस्पृश्यता म्हणजे एका जातीत जन्म झाला एवढ्याच एका कारणाकरिता तशा सर्व स्त्रीपुरुषांवर लादली जाते ती , " जन्मजात अस्पृश्यता ' होय. म्हणजे अस्पृश्यतेत जो विशेष घटक निषेधार्ह ठरविलेला आहे , तो मानीव जन्मजातपणा हा होय. हे मर्म ध्यानात घेतले असता हे स्पष्ट होईल की , असल्या केवळ मानीव जन्मजातपणामुळे ज्या हीनता , उच्चनीचता नि अक्षमता जातिभेदाच्या आजच्या दुष्ट रुढीमुळे आपल्या हिंदुसमाजातील जातिजातींना चिकटविलेल्या आहेत. त्यापैकी जन्मजात अस्पृश्यतेची हीनता नि अक्षमता आजच्या रुढीप्रमाणे अत्यंत असमर्थनीय नि दुष्ट असल्यामुळे यद्यपि ती अस्पृश्यताच काय ती वरील छेदकाने निर्बंधाविरुद्ध (बेकायदेशीर) आणि दंडनीय ठरविली असली तथापि त्या योगे नि त्याच न्यायाने तसल्या इतर जन्मजात म्हणून गणल्या गेलेल्या मानीव हीनता , उच्चनीचता वा अक्षमता ह्याही न्यूनाधिकपणे असमर्थनीय नि निषेधार्ह आहे हेही सूचित केलेले आहे.

जातिभेदातील ही अस्पृश्यता सोडता , उरलेल्या आणि उच्चनीचपणाची कोष्टके ही अगदी अनैर्बधिक ठरविलेली नसली तरी ती अवैध आहेत. दंडनीय नसली तरी खंडनीय होत. ह्या छेदकातील हा जो गर्भितार्थ , ह्या राज्यघटनेत भारतीय नागरिकांच्या मूलभूत समतेची जी ग्वाही मुखबंधातच (प्रिअँबलमध्येच) दिलेली आहे. पुढे नागरिकांच्या मूलाधिकारांच्या प्रकरणी जी स्पष्ट विधाने केलेली आहेत की भारतीय राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ धर्म , वंश , जाति , लिंग , जन्मस्थान , ह्यापैकी कोणत्यही कारणासाठी कोणताही भेदभाव बाळगणार जाईल. (छेदक १४-१५) त्या विधानांवरून तो गर्भितार्थ स्पष्टपणेच समर्थिला जात आहे.

अशा रितीने केवळ मानीव असणार्‍या जन्मजात अस्पृश्यतेचाच नव्हे तर जन्मजात म्हणविणार्‍या परंतु केवळ पोथीजात असणार्‍या ह्या जातिभेदाच्या आजच्या दुष्ट रुढीप्रमाणे जातीजातीवर लादलेल्या इतर सर्व प्रकारच्या मानीव हीनतांच्या नि अक्षमतांच्या पायावरही ह्या राज्य घटनेने नैर्बधिक कुर्‍हाड घातलेली आहे. आता कोणाच्याही हिंदू स्त्रीपुरुषास तो अमक्या जातीत जन्मला एवढ्याच एका कारणासाठी कोणतीही हीनता वा अक्षमता सोसावी लागणार नाही किंवा कोणताही उपजत विशिष्टाधिकार वा विशिष्ट उच्चता उपभोगिता येणार नाही. निर्बंधाच्या (कायद्याच्या) क्षेत्रात जात कोणती हा प्रश्र्नच उरलेला नाही.

दुदैवाने याला एक अपवाद मात्र राहून गेला तो म्हणजे दलित वर्गांना काही वर्षापुरत्या दिलेल्या विशिष्ट सवलती. सध्याच्या परिस्थितीत अमक्या जाति म्हणून नव्हे तर दलित वर्ग म्हणून अशा सवलती देणे हे योग्यच होते , अपरिहार्यही होते. परंतु त्या दलित वर्गाच्या परिगणानात "वर्गीकृत जाति ' असा जातींच्या पायावर जो विभाग पाडला आहे तो तसा पाडावयास नको होता. त्यायोगे काही केवळ जन्मजातपणावर मिळविले जाणारे विशिष्टाधिकार- राखीव जागा , चाकर्‍या इत्यादी- काही जातींना जात म्हणून मिळणार आहेत. म्हणजे त्या प्रमाणात जन्मजात जातिभेद घटनेत मानला गेला. हे त्या घटनेच्याच वर उल्लेखिलेया नागरिकांच्या अपवाद टाळूनही त्या दलितांची सोय लावता आली असती. परंतु ह्या लेखात केवळ अस्पृश्यतेचा अंत करणार्‍या घोषणेचाच विचार कर्तव्य असल्याने इतकाच उल्लेख पुरे आहे की , वरील एक फारसे महत्व नसलेला अपवाद वजा घातला तर ह्या अस्पृश्यतेविषयीच्या घोषणेने नि इतर विधानांनुसार या राज्यघटनेने जन्मजात जातिभेदाच्या दुष्ट रुढींचाही कणाच मोडून टाकला आहे.

अस्पृश्यता हा दंडनीय अपराध ठरविणार्‍या या घोषणेचे खरे महत्व , मर्म आणि दूरवर होणारे परिणाम हे साकल्याने जनतेच्या ध्यानात यावे ह्यास्तव ज्या परिस्थितीत नि ज्या प्रकारे ती घोषणा करण्यात आली त्यांचीही सूक्ष्म छाननी करणे अवश्य आहे. अशी छाननी अद्याप सुसंगतपणे झालेली नाही. आणि दुसरे असे की तशी छाननी झाल्यावाचून ह्या घोषणेप्रमाणे आपल्या अफाट भारतीय समाजात रोमारोमात भिनलेली ही जन्मजात अस्पृश्यतेची भावना आमूलात् ‌समाजाच्या खालच्या थरापर्यंत उन्मळून टाकण्याचे दुष्कर कार्य केवळ निर्बंधबळाने (कायद्याच्या जोरावर) सुकर केले जाणार नाही. जेव्हा निर्बंधबळाला जनतेच्या उत्कट इच्छेचेही पाठबळ मिळते तेव्हा काय ते कोटी कोटी लोकांच्या अगदी हाडीमासी खिळलेल्या अशा शतकानुशतकांच्या रुढींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साध्य होते. ह्या घोषणेची ह्या कारणासाठी अशी छाननी करू जाता तिच्यातील खाली दिलेली मुख्यमुख्य विधेये स्पष्ट होतील.

( सावरकर डॉट ऑर्ग या वेबसाइट वरून साभार)

विज्ञाननिष्ठ निबंध

विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना अन्य अनेक दिग्गजांपेक्षा खूप मोठा बनवते. त्याच्या तर्कशुद्ध बुद्धिवादाची एक झलक आपल्याला या विज्ञाननिष्ठ निबंधातून पाहता येईल. हा लेख सावरकर डॉट ऑर्ग या वेबसाइटवरून साभार...
................
वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्‌कन वेगळ्या झाल्याशा भासतात.

ह्या पदार्थजगतातही मनुष्याच्या जाणिवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात्‌दोन भाग पडतात. उभे विश्व, अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन्‌कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कूरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदूल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी, ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्चयावत् ‌विश्वाचा, वस्तुजागताचा, केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच अकस्मात्‌उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग, मनुष्यास जो दु:खद तो दुसरा पहिला चांगला, दुसरा वाईट. ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव; मनुष्यास दु:ख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस.

मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरेवाईटपणा, मोजला असता ह्या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही.
विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूपगंधस्पर्शादि सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकतात. विश्वातील वस्तूजात एकेकी गणून, तिचे पृथक्करण करून, ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंत्री करीत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोषातील वस्तुजाताचे मोजमाप करणे केवळ अशक्य असे समजून आपल्या प्राचीन तत्त्वज्ञान्यांनी, आपल्या पाच ज्ञानेंद्रियानीच ज्या अर्थी हे सर्व विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणारे आहे ते जाऊ शकते, त्या अर्थी त्याचे "पंचीकरण' करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरविले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे, तर तो त्यांच्या अप्रतिम विजयच होता.

ज्ञानेंद्रियेच जर पाच तर विश्वाचे यच्चायावत्‌वस्तुजात त्यांच्या त्या पाच गुणांपैकी कोणत्यातरी एका वा अनेक गुणांचेच असणार. अर्थात्‌त्या पाच गुणांच्या तत्त्वांनी, पंचमहाभूतांनीच, ते घडलेले असणार. ह्या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या पाचमुखांनीच काय तो होणार म्हणूनच तो विश्वदेव, तो महादेव पंचमुखी होय! आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य नि सहज, तितकाच स्वत:च्या अंत:करणाने त्या विश्वाला निमिणार्‍या देवाच्या अंत:करणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टि निर्मिली असली पाहिजे, ह्या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टिदेवीच प्रतिपदी, प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही, आजही देतेच आहे!

खरोखर, मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणाने केली आहे पहा! हा सूर्य, हा समुद्र - किती प्रचंड ही महाभूते ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान तहान करीत मुले खेळत दमून येतील तेव्हा थंडगार नि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून "कुज्या'त घालून गारत ठेवते, तशा ममतेने उन्हाळ्याने नद्या सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातले पाणी किरणांचे दोर खोलखोल सोडून भरतो, मेघांच्या "कुज्या'तून साठवून ठेवतो, आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून, की असमुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे ते पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड नि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्याही तोंडास पाणी सुटावे ! पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीच साराचा सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयाळू देव सावधगिरीही घेववितो - एका वर्षात हवे तितकेच पाणी गोड करून आटविण्याइतकीच शक्ति सूर्यकिरणात आणि साठविण्याइतकीच शक्ति मेघात ठेविली जाते. नाहीतर सारा समुद्रात गोड झाल्याने मनुष्यास मीठ मिळणे बंद होऊन त्याचा सारा संसार अळणी व्हावयाचा !

तशीच ही मनुष्याच्या देहाची रचना! पायाच्या तळव्यापासून तो मज्जातील सूक्ष्मातिसूक्ष्म पिंडानुपिंडापर्यंत ह्या शरीराची रचना मनुष्याला सुखदायी होईल अशीच सुसंवादी करताना हे मनुष्यच्या देवा, तू जी केसानुकेसागणीक काळजी घेत आला आहेस ती कुठवर सांगावी ! मनुष्याचा हा एक डोळा जरी घेतला तरी, किती युगे, किती प्रयोग, किती अनवरत अवधाने करून तू हा आज आहे तसा घडवू शकलास! प्रथम प्रकाशाला किंचित्‌संवादी असा एक नुसता त्वग्बिंदु; प्रकाशाला नव्हे तर त्याच्या सावलीला तेवढा जाणणारा; अंधेर नि उजेड इतकाच फरक काय तो जाणणारा तो पहिला त्वग्बिंदु; त्याच्यात सुधारणा करता करता किती प्रयोग करून, किती रद्द करून, पुन्हा प्रयोग रचता रचता शेवटी आज मनुष्याचा सुंदर, टपोरा, पाणीदार, महत्त्वाकांक्षी डोळा तू घडविलास! इतका महत्त्वाकांक्षी डोळसपणा त्या मनुष्याच्या डोळ्यात मुसमुसत आहे की, देवा, तुझ्याच कलेत तुझाच पाडाव करण्यासाठी दुर्बिणीचे प्रतिनेत्र निर्मून तो तुझ्या त्या आकाशातील प्रयोगशाळेचेच अंतरंग पाहू इच्छीत आहे! नव्हे तुलाही त्या दुर्बिणीच्या टप्यात गाठून कुठेतरी प्रत्यक्ष पाहता येते की नाही याचे प्रयोग करू म्हणत आहे!!!

आणि त्या मनुष्याच्या डोळ्यास प्रसादविण्यास्तव सौंदर्याचा नि सुरंगाचा जो महोत्सव तू त्रिभुवनात चालू केलास त्याची आरास तरी काय वर्णावी? आम्हाला, जशी आमच्या लेकरांची माया आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सुखासाठी जपतो तसेच आमच्या सुखासाठी इतके जपणार्‍या देवा, तुला आम्हा मनुष्यांची माया असलीच पाहिज. आम्ही माणसे, देवा, तुझी लेकरे आहोत. तू आमची खरी आई आहेत! आईला देखील दूध येते-तू दिलेस म्हणून! आम्ही मनुष्ये मुझे भक्त आहोत, आणि देवा, तू आम्हा मनुष्यांचा देव आहेस.
इतकेच नव्हे, तर तू आम्हा मनुष्यांचाच देव असून तूझ्यावाचून दुसरा देव नाही! हे सारे जगत्‌तू आमच्या सुखसोयीसाठीच घडविले आहेस!

मनुष्याच्या इच्छेस जुळेशी ही विचारसरणी, सत्यास जुळेल अशीही ठरली असती-जर या जगातील प्रत्येक वस्तु नि प्रत्येक वस्तुस्थिति मनुष्याला सुखकारक नि उपकारक अशीच असती तर! पण मनुष्याच्या दुर्दैवाने या सार्‍या जगातील तर राहोतच, पण ज्या पृथ्वी तो मनुष्य प्रथम प्रथम तरी "सारे जग' म्हणून स्वाभाविकपणेच संबोधित होता, जिला विश्वंभरा, भूतधात्री, अशा नावाने तो अजूनही गौरवितो, त्या पृथ्वीवरील वस्तुजातही वा वस्तुस्थितिही मनुष्यास सर्वस्वी अनुकूल नाही; इतकेच नव्हे, तर उलट अनेक प्रकरणी मारकच आहे.

ज्या सूर्याचे नि समुद्राचे मनुष्यावर झालेले उपकार आठवून आठवून आताच त्यांची स्तोत्रे गाइली तो सूर्य नि तो समुद्रच पहा! कुराणात, तौलिदांत, भाविक पैगंबरांनी स्तुति केली आहे की "मनुष्यासठी, हे देवा, हे किती असंख्य मासे, किती रुचकर अन्नाचा हा केवढा अखंड साठा तू या समुद्रात ठेवला आहेस!' पण तोच समुद्र मनुष्यास जशाचा तसाच गिळून पचवून टाकणार्‍या अजस्त्र सुसरींना आणि प्रचंड हिंस्त्र माशांनाही तसेच नि:पक्षपाताने पाळीत आहे! आशिया आणि आफ्रिका यांस जोडणारे खंडच्या खंड ज्या दिवशी महासागरात, त्या खंडावरील वर माला घेऊन उभ्या असलेल्या लक्षावधि कुमारिकांसह, दूधपाजत्या आयालेकरांसह, अर्धभुक्त प्रणयी जनांसह, पुजांजलि वाहत्या भक्तांसह, त्याच देवाची स्तुती चाललेल्या लाखो देवालयांसह ते खंडच्या खंड त्याच देवाने ज्या दिवशी त्या महासागरात गणपति हबकन्‌बुडवावा तसे बुडविल, त्याच्या दुसर्‍या दिवशी हीच उषा, हीच वेदांनी गाइलेली उषा, असेच गोड गुलाबी हास्य हसत त्या शुकशुकाट दृश्याकडे पहात होती!

जर ह्या विश्वातील यच्चयावत्‌वस्तुजातीच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी आणि खोटी आहे असे मानल्यावाचून वरील विसंगतीचा उलगडा होऊच शकत नाही.

तरीदेखील ज्या कोणच्या हेतूने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगड्‌व्याळ उलाढाल चालू आहे तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे, इतके सुख नि इतक्या सोयी अपभोगिता येतात हा मात्र आणि एढाच काय तो ह्या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला ह्या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर ह्या विश्वाची रचना ह्या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता! हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि, ह्या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत! ज्या योगायोगाने मनुष्यास ह्या सर्व लाभत आहेत त्या योगायोगाला शतश: धन्यवाद असोत! ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल!

परंतु त्या पलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमूलात्‌सोडून द्यावी हेच इष्ट! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत.

ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे-असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!!

(संपादित)

सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द

महापौर, अर्थसंकल्प, दूरदर्शन या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केली आहे, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. पण याव्यतिरिक्त अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. त्यांची ही भाषाशुद्धी चळवळ खूपच गाजली. त्यांच्या या शब्दसंपदेबद्दल...
...............................

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।

असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. यू नो , यू सी हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय...

संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.

पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?’ , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?

आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात-लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात , तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात . पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक्‍तच होत नाही , असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले , असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात ' , असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.

स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.

दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)

असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.

सावरकरांच्या प्रसिद्ध कविता

आत्मबल
अनादि मी अनंत मी , अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला


हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।


जयोस्त्तु ते

जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं , नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे , कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

तनुवेल

सकाळीच तू तोडित असता जाईजुईच्या फुलां
माडीवरुनि सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला

उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी
कुरळ केश रुळताति गोरट्या मानेवरि सुटुनी

पदर खोवले पातळ गेलें कटितटिला लगटुनी
स्मृति सखये तव मनिं माझिया संगतिच्या उठुनी

बघसि चोरटे मी तुज दिसतो वरती का कुठुनी
दिसताचि मी हसू उषेसम मुखि तव ये फुटुनी

अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जैं तुला
फुलवेलिहूनि तनुवेलची तव मोहक दिसली मला

( सावरकरांच्या कविता या काव्यसंग्रहातून साभार.)

सावरकरांवर लिहिली गेलेली पुस्तके

चरित्रात्मक

अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा , स्नेहल प्रकाशन, पुणे
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र , महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरूष सावरकर , परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
-------- १९४३. सावरकर - चरित्र (कथन) , सीताबाई करंदीकर, पुणे
-------- १९४७. सावरकरांचे सहकारी , गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
क-हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील
अलौकिक विशेषांक , सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर अँड हिज टाईम्स
खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर , पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची , विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर - दर्शन व्यक्ति नि विचार , गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम , दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर , मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक रहस्य , मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात , मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी , लोकमान्य प्रकाशन, पुणे
-------- १९८३. सावरकरांशी सुखसंवाद , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर , साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र , गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर , महाजन ब्रदर्स, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन , उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरूत्थान , पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतीकल्लोळ , मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंजः सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर , स्वा. वीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर , अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर , अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर , प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा , श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय
प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप , मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत , सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे , कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
जीवनदर्शन , जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र , भोपे, र.ग., अहमदनगर
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर , मोरया प्रकाशन, डोंबिवली
रायकर, गजानन १९६६. महापुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र , लोकमान्य छापखाना, मुंबई
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर , संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
व-हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरूडझेप (सावरकर गौरवग्रंथ) , विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर , केसरी प्रकाशन, पुणे
-------- १९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर , न.पा. साने, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले , नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर , साटम प्रकाशन, मुंबई
सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०),
वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा विदासा , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वा. सावरकरांच्या आठवणी), स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ), मुंबई
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार , पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र , चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर - दर्शन , द.स. हर्षे, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात - शत्रूच्या शिबिरात , सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७, आत्मवृत्त , व्हिनस प्रकाशन, पुणे
१९५८, सावरकर विविध दर्शन , व्हिनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी , अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र । पूर्वपीठिका ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र । भगूर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची , स्वातंत्र्यवीर सावरकर
साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
वीर सावरकर जयंती निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध, अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई

मुलांसाठी

आफळे, गोविंदस्वामी १९४४. वीर सावरकर , अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे
कल्लोळ, अनंत, तेलंग वामन (अनुवाद), देशपांडे सुरेश दत्तात्रय (संपादन आणि राठी संस्करण) १९९३. स्वातंत्र्यवीर सावरकर , भारत-भारती बाल-पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर
क-हाडे, शंकर २००५. गोष्टीरूप सावरकर
कानिटकर, माधव १९६५. महाराष्ट्राचे महापुरूष स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर , कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस, पुणे
गोडबोले, अनिल १९९१. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर , उन्मेष प्रकाशन, पुणे
गोडबोले, डॉ. अरविंद २००५. असे आहेत सावरकर , भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
घोरपडे, रा.शं., गोंधळेकर, वि.न. १९५२. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनप्रसंग , नेर्लेकर प्रकाशन, पुणे
ताटके, अरविंद १९९०. स्वातंत्र्यवीर सावरकर , मीनल प्रकाशन, कोल्हापूर
दिघे, प्रभाकर १९९३. स्वदेश क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर , आरती प्रकाशन, डोंबिवली
परचुरे, ग.पां. १९४१. मुलांचे तात्याराव सावरकर , रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई
भिवगडे, ज्ञानेश्वर १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर , लाखे प्रकाशन, नागपूर
महाजन, भास्कर १९९६. स्वातंत्र्यवीर सावरकर , नुतन साहित्य, नागपूर
मुधोळकर, रमेश १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , रविराज प्रकाशन, पुणे
शिखरे, दा.न. १९५८. स्वातंत्र्यवीर सावरकर , श्री. बा. ढवळे, मुंबई
सहस्त्रबुद्धे, प्र.ग. १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई

स्मरणिका । गौरविका

आठवले, उदय, देशमुख, अनंत (संपादक) १९९२. स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन
प्रतिष्ठान, स्मरणिका, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, ठाणे
खोले, विलास (संपादक), १९८४. सूर्यबिंबाचा शोध (स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविका)

साहित्य समीक्षा

कुलकर्णी, व.दि. २००४. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक चिंतन , पद्मगंधा प्रकाशन, पुणे
गावडे, प्रभाकर लक्ष्मण १९७०. विनायक दामोदर सावरकर एक चिकित्सक अभ्यास , स्वाध्याय महाविद्यालय, पुणे
-------- (संपादक) १९८४. सावरकरांचे साहित्य चिंतन , संजय प्रकाशन, पुणे
काव्यमीमांसा
अधिकारी, गोपाळ गोविंद १९६३. सावरकर (महाकाव्य) भाग पहिला , अधिकारी प्रकाशन, पुणे
पोहरकर, संजय १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमीमांसा , अक्षय प्रकाशन, पुणे
बढे, राजा (रूपांतर) १९८०. योजनगन्धा , परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
मायदेव, वासुदेव गोविंद (संपादक) १९४३. सावरकर काव्य समालोचन , केशव भिकाजी ढवळे, मुंबई
रानडे, भालचंद्र लक्ष्मण (अनुवाद) १९८१. सप्तर्षी , भा.ल. रानडे
सावरकर, बाळाराव (संपादक) १९७१. गोमांतक , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

नाट्यसमीक्षा

परचुरे श्री. दि. १९८३. नाटककार सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
वैचारिक साहित्य समीक्षा
केळकर, भा.कृ. १९८३. समाजसुधारक सावरकर , अस्मिता प्रकाशन
केळकर, गणेश ल.(संपादक) १९९३. महामेरू, वसंत बुक स्टॉल, मुंबई
गोडबोले, अरविंद सदाशिव १९८३. सावरकर विचारदर्शन , पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
२००८, भारतीय विचार साधना प्रकाशन , पुणे
जोगळेकर, ज.द. २००२. ज्ञानयुक्त क्रांतीयोद्धा , मनोरमा प्रकाशन, मुंबई
देशपांडे, सुधाकर १९८८. सावरकरांचे आठवावे विचार (अर्थात) सावरकरवाद , श्रीअष्टविनायक जोशी, नांदेड
फडके, य.दि. (संपादक) १९८६. तत्त्वज्ञ सावरकर निवडक विचार , कॉन्टिनेन्टल
प्रकाशन, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे.
मोरे, शेषराव १९९२. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास , राजहंस प्रकाशन, पुणे
२००३. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद , राजहंस प्रकाशन, पुणे
२००३. सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग , राजहंस प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९९५. सावरकरांच्यावरील काही आक्षेप आणि त्या आक्षेपांची चिकित्सा , सुधा. द. हर्षे, क-हाड
२००६, सावरकर एक अभिनव दर्शन , अभिनव निर्माण प्रतिष्ठान, पुणे
१९७३, सावरकरांचे सामाजिक विचार (प्रस्तावना - विद्याधर पुंडलीक), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई

राजकारण

देशपांडे, स.ह. १९९२. सावरकर ते भा.ज.प.हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख , राजहंस प्रकाशन, पुणे
शमसुल, इस्लाम २००५. सावरकरः भ्रम आणि वास्तव , सुगावा प्रकाशन, पुणे
चरित्रात्मक कादंबरी
खेर, भा.द.,राजे, शैलजा १९६८. यज्ञ . जयराज प्रकाशन, पुणे
भट, रवीन्द्र १९७३. सागरा प्राण तळमळला , संजय प्रकाशन, पुणे

(सावरकर डॉट ऑर्ग वरून साभार..)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनक्रम

जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ || निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)

१८८३ मे २८ - जन्म भगूर गाव(जि. नाशिक).
१८९२ - आईचे निधन.
१८९८ मे - देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ.
१८९९ सप्टें ५ वडिलांचे निधन.
१९०० जाने १ -मित्रमेळ्याची स्थापना.
१९०१ मार्च - विवाह.
१९०१ डिसे.१९ - मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
१९०१ जाने.२४ - पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.
१९०४ मे. - अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.
१९०५ दसरा - विदेशी कपडयांची होळी.
१९०५ डिसे.२१ - बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९०६ जून ९ - लंडनला प्रयाण.
१९०७ मे १० - १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव.
१९०७ जून - मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले.
१९०८ मे २ - लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव.
१९०८ - हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले.
१९०९ मे - बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार.
१९०९ जून - वडील बंधु श्री.बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.
१९०९ जुलै धिंग्रा यांच्याकडून कर्झन वायलीचा वध.
१९०९ आक्टो.२४ - लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ.गांधी.
१९१० मार्च १३ - पॅरिसहून लंडनला येताच अटक.
१९१० जुलै ८ -मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी.
१९१० डिसे.२४ - जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.
१९११ जाने.३१ - दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा.
१९११ जुलै ४ - अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ.
१९१९ एप्रिल - (बाबारावांच्या पत्नी)सौ.येसुवहिनींचे निधन.
१९२० नोव्हें. - धाकचे बंधू डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.
१९२१ मे.२ - बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.
१९२१ नि १९२२ - अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास.
१९२३ - मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा.
१९२४ जाने.६ - राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातून सुटका.
१९२५ जाने.७ - कन्या प्रभात हिचा जन्म.
१९२६ जाने.१० - हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२७ मार्च १ - रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट आणि चर्चा.
१९२७ मार्च १७ - पुत्र विश्वास याचा जन्म.
१९३० नोव्हें १६ -रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन
१९३१ फेब्रु.२२ -पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.
१९३१ फेब्रु २५ - मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष.
१९३१ एप्रिल २६ -सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष. पतित-पावन मंदिरात सभा.
१९३१ सप्टें २२ -नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली.
१९३१ सप्टें १७ -श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन.महाराचा गीतापाठ
आणि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.
१९३७ मे १० -रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता.
१९३७ डिसे.३० -हिंदुमहासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.
१९३८ एप्रिल १५ - महाराष्ट्र-साहित्य-संमेलन २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष.
१९३९ फेब्रु १ -निजाम विरोधी भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार प्रारंभ.
१९४१ जून २२ -सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले.
१९४१ डिसे.२५ -भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.
१९४३ मे २८- ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ.भा. सत्कार आणि निधी समर्पण.
१९४३ आगस्ट- १४ नागपूर-विद्यापीठाने डी. लिट. ही सन्मान्य पदवी दिली.
१९४३ नोव्हें ५- अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष.
१९४५ मार्च १६ -वडील बंधु श्री.गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.
१९४५ एप्रिल १९ -अ.भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.
१९४५ मे ८ -कन्या प्रभात चा विवाह, पुणे.
१९४६ एप्रिल -मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली.
१९४७ आगस्ट- १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले.
१९४८ फेब्रु. -५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.
१९४९ फेब्रु १० -गांधीहत्या अभियोगातून निष्कलंक सुटका.
१९४९ आक्टो १९ - धाकटे बंधू डा. नारायणराव यांचे निधन.
१९४९ डिसे. - अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.
१९५० एप्रिल ४ - पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास.
१९५२ मे १०-१२ - अभिनव-भारत संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे.
१९५५ फेब्रु.- रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.
१९५६ जुलै २३ -लो.टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.
१९५६ नोव्हें १० - अ.भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.
१९५७ मे १० - दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण.
१९५८ मे २८ - ७५ वा वाढदिवस. मुंबई महापालिकेकडून सत्कार.
१९५९ आक्टो ८ - पुणे विद्यापीठाने डी-लिट सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली.
१९६० डिसें. २४ - मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).
१९६१ जाने.१४ - मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).
१९६२ एप्रिल १५ - मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले.
१९६३ मे २९ - मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात.( मुंबई)
१९६३ नोव्हें ८ - पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
१९६४ आगस्ट १ - मृत्युपत्र केले.
१९६४ आक्टो. - भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.
१९६५ सप्टें - गंभीर आजार.
१९६६ फेब्रु १ - अन्न आणि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ.
१९६६ फेब्रु २६ - शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन. वय८३
१९६६ फेब्रु २७ -महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा.स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....

(सावरकर डॉट ऑर्ग वरुन साभार)