Thursday, May 29, 2008

सावरकरांच्या प्रसिद्ध कविता

आत्मबल
अनादि मी अनंत मी , अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

सागरास

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला


हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।


जयोस्त्तु ते

जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं , नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे , कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

तनुवेल

सकाळीच तू तोडित असता जाईजुईच्या फुलां
माडीवरुनि सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला

उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी
कुरळ केश रुळताति गोरट्या मानेवरि सुटुनी

पदर खोवले पातळ गेलें कटितटिला लगटुनी
स्मृति सखये तव मनिं माझिया संगतिच्या उठुनी

बघसि चोरटे मी तुज दिसतो वरती का कुठुनी
दिसताचि मी हसू उषेसम मुखि तव ये फुटुनी

अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जैं तुला
फुलवेलिहूनि तनुवेलची तव मोहक दिसली मला

( सावरकरांच्या कविता या काव्यसंग्रहातून साभार.)

No comments: